• माळेगाव, ता. लोहा, जिल्हा. नांदेड.
  • +९१ ८६ ९८४८ ७६१८
  • skyastech@gmail.com

माळेगाव यात्रा

माळेगाव हे नांदेड, लातूर व परभणी या तीन जिल्हांच्या सीमेवर माळावर वसलेले सुमारे २७०० लोकसंख्या असलेले एक छोटेसे गाव लोहा तालुक्यात नांदेड – लातूर या राज्यमार्गावर हे गाव आहे. गावात धनगर, लिंगायत, गुरव, हटकर, बौद्ध इ. लोकांची वस्ती असून, पांढऱ्या मातीची घरे आजही आढळतात. माळेगाव बहामनी नंतर काही काळ निजामी राजवटीत होते. निझामाच्या काळातही खंडोबाच्या मंदिराची कुठल्याही प्रकारे मोडतोड झाली नाही व यात्रेची परंपराही चालू राहिली. निझामी राजवटीत यात्रा व मंदिराची व्यवस्था कंधार परगण्याचे राजे गोपालसिंग कंधारवाला यांच्याकडे होती. सध्या मंदिराची व्यवस्था ट्रस्टकडे व यात्रेची व्यवस्था जिल्हा परिषदेकडे आहे. खंडोबा मंदिराचे बांधकाम दगडात केलेले असून, मुख्य मंदिरापासून महाद्वारपर्यंत असलेल्या मंडपाच्या जागी सिमेंट कॉंक्रीटच्या मंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. मंदिराच्या महाद्वारास बाभूळगाव, जिल्हा. लातूरचे खंडोबाचे निस्सीम भक्त कै. दगडोजीराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे.

मंडपाच्या मध्यभागी दगडी ओट्यावर मणी मल्लासुराचे उलटसुलट मुखवटे कोरलेले आहेत. त्रिशूळ कोरलेले आहेत. गणपती, पादुका, चंद्र व सूर्य इत्यादी कोरीव कामेही आहेत. खंडेरावभिमुख असलेल्या मणी मल्लासुरापासून खंडोबा म्हाळसेचे समोरच दर्शन होते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपालांची शिल्पे असून, गाभारयाच्या आतील भागास निरनिराळ्या देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. स्वयंभू वेदीवर दगडी चौरंगावर खंडोबा म्हळसेचे मुखवटे आहेत. त्याच्यासमोर तांदळा आहे.

हि यात्रा पूर्वीच्या काळी महिनाभर भरत असे. सध्या मात्र पाच दिवसांची असते. परंपरेने मराठी महिन्यानुसार मार्गशीष वद्य चतुर्थीपासून यात्रा सुरु होते. जेष्ठ नक्षत्रावर देवस्वारी निघते. या देवस्वारीचा मान नाकोजी नाईकांनंतर सातव्या पिढीकडे अव्याहतपाने चालू आहे. नाकोजी नाईक, नानासाहेब नाईक, बापूसाहेब नाईक, हैबतराव नाईक, मल्हारखान नाईक, व गणपतराव नाईक असा हा वारसा पुढील पिढीतील संजय नाईक चालवतील. निझामाच्या राजवटीत खंडोबाची देवस्वारी निघाली असताना निझामांत नागोजी नाईक यांची पालखी हेतूपरस्पर देवाच्या पालखीमागे ठेवली. काही अंतर पुढे जाताच पालखीच्या दांड्या मोडल्या. यावेळी पाठीमागच्या पालखीत बसलेल्या नागोजी नाईकांनी आपला फेटा काढून मोडलेल्या दांडयांना बांधला तेव्हा पालखी उचलली गेली. निझाम खजील झाला व तेव्हापासून नाईकांची पालखी देवस्वारीत देवाच्या पुढे असते. रीस्नगावाहून निघून नैक्ची देवस्वारी पूजेच्या आदल्या देवशी माळेगावात पोहोचते. देवस्वारीने सुरु झालेली यात्रा जातपंचायतीने संपते.

यात्रेतील आर्थिक उलाढाल

यात्रेच्या कालावधीत या ठिकाणी कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. ठिकठिकाणचे व्यापारी आपला माल या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन येतात. या सर्व लोकांची, त्यांच्या सामानाची, त्यांच्या मालाची तसेच बरोबर आणलेल्या प्राण्यांच्या रक्षणाची जबाबदारी आम्हा पोलिसांची असते. पाचही दिवस माळेगावात तळ निरनिराळ्या जाती धर्माचे लोक त्यांचे निरनिराळे पेहराव, वेगवेगळ्या चालीरीती या यात्रेच्या निमिताने बघावयास मिळतात.

माणसाला प्रत्येक वेळी खरेदीकरिता काहीतरी निमित्त हवे असते. घरात निघणारे लग्नकार्य, सणवार याबरोबरच यात्रा हे फार मोठे निम्मित खरेदिदारांकारीताच असते. नुसते निम्मितच नाही तर निरनिराळ्या ठिकाणच्या जीनसा एकाच ठिकाणी मिळण्याची ती एक सुवर्णसंधीच असते. माळेगावची यात्रा देखील याला अपवाद नाही. पाच – दहा पैशांच्या सुईपासून लाखो रुपये किंमतीच्या घोड्यापर्यंतची खरेदी – विक्री या ठिकाणी होत असते. अनेक संसारोपयोगी वस्तू, मुलांसाठी खेळनी, खाऊ, शेतीसाठी लागणारी अवजारे, व्यवसायासाठी लागणारी हत्यारे, कपडे, भांडी, जनावरांसाठी लागणारे साखळ्या, घुंगरू, झूल, खोगीर, पट्टे, कासरे, चाबूक, गोंडे इ. अनेक वस्तू तसेच स्त्रियांच्या प्रसाधनाकरिता लागणाऱ्या वस्तू, दागिने अशा कितीतरी जिनसांची दुकानी भरलेली असतात.

राजापुरी खोबरे, भंडारा, नारळ, बत्ताशे, खडीसाखर, साखरफुटाने, पेढे, मुरमुरे, रेवड्या, कुंकू, बुक्का, अष्टगंध इ. सामग्रीची दुकाने... थाटलेली असतात. तुळजापूर, पंढरपूर, जेजुरीहून आलेल्या देवदेवतांच्या पितळी मूर्ती तसेच तस्बीरांची दुकाने असतात. जवळच्या शहरातील प्रसिद्ध मिठाईची दुकाने असतात. कोसल्याचा पटका, शेला, पागोटे, सोलापुरी चादर, उदगीरचे घोंगडे, नेपाळी लोकरीचे कपडे यांसारख्या कापडाबरोबरच जुन्या कपडयांची देखील बाजारपेठ भरत असते. हस्तिदंती बांगड्या खरेदी करण्यासाठी लमाण शतस्त्रिया दूरदूरवरून या ठिकाणी येत असतात.

कलावंतिणीच्या पायातील चाळ, वासुदेव, आराधी, पोतराज, मानकवड्या, वाघ्याच्या कोताम्ब्यापासून झांज, सूर, सनई, हलगी, ताशे इ. अनेक प्रकारचे साहित्य या ठिकाणी उपलब्ध असते. माळेगावचे प्रमुख आकर्षण म्हणजे घोड्यांचा बाजार. हा या यात्रेतील अर्थव्यवस्थेचा कणाच होय.